फेब्रुवारीमधील आतापर्यंतची गुंतवणूक_ विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजाराला पसंती
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी बीएसई सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 52 हजारच्या नवीन टप्प्यावर पोहोचत बंद झाला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 60 हजार कोटीपेक्षा अधिकची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांकडून करण्यात आली आहे. जानेवारीमधील शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये सावध पवित्रा घेत गुंतवणूकदारांनी चालू महिन्यात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या आतापर्यंतच्या कालावधीपर्यंत इक्विटी बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 18,883 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये जानेवारीच्या संपूर्ण महिन्यात केवळ 19 हजार 473 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणावेळी मुंबई शेअर बाजाराने अडीच हजारपेक्षा अधिक अंकांची तेजी प्राप्त केली होती. त्यांच्या दुसऱया दिवशीही जवळपास 1 हजार अंकांपेक्षा अधिकचा टप्पा गाठला होता. त्यानंतर चालू आठवडय़ातील सोमवारी पुन्हा एकदा बीएसई सेन्सेक्स नवा विक्रम प्राप्त करत प्रथम 52 हजारांची उंची प्राप्त करत बंद झाला आहे.
तिमाही अहवालाचा प्रभाव
विश्लेषकांच्या माहितीनुसार तिसऱया तिमाहीत भारतीय कंपन्यांचा अहवाल हा मजबूत राहिल्याचे पहावयास मिळाले होते. यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचे आतापर्यंत 3,087 कंपन्यांनी आपले अहवाल सादर केले आहेत. यातील जवळपास 68.7 टक्के कंपन्यांच्या नफा कमाईत वाढ झाल्याची नेंद करण्यात आली आहे. सदरचा अहवाल हा चालू आर्थिक वर्षातील 9 महिन्यांमधील सर्वात मजबूत अहवाल असल्याची नोंद करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांच्या पसंतीची क्षेत्रे
भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांनी टोटल फायनान्शिअल क्षेत्रात 1,247 कोटी, अन्य फायनान्शिअल क्षेत्रात 1,771 कोटी, दूरसंचारमध्ये 1,804 कोटी, धातू आणि खाण क्षेत्रात 1,986 कोटी, कॅपिटल गुड्समध्ये 2,714 कोटी रुपये आणि ऑटो मोबाईलसह सुट्टेपार्ट क्षेत्रात 2,798 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांनी पसंती दर्शवली आहे.