इराण्णा सिंहासने इचलकरंजी
अमेरिका सारख्या प्रगत देशात नोकरीसाठी सध्याची तरुणाई धडपडत असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास व मेहनत करण्याची इच्छाशक्तीही त्यांच्यामध्ये दिसून येते. हल्ली अनेकांचे माता-पिता अभिमानाने माझा मुलगा अमेरिकेत आहे, असे सांगत असतात. पण अमेरिकेत स्थिरस्थावर झालेल्या वडिलांनी मुलाच्या गायनाची आवड जोपासण्यासाठी चक्क अमेरिकेतील नोकरी सोडून मायदेशात स्थायिक झाले आहेत. तर पित्याचा त्याग जाणून असलेला हा मुलगा गायन क्षेत्रात उत्तुंग भरारीसाठी सज्ज झाला आहे. हा मुलगा म्हणजे इचलकरंजी शहराच्या मुरदंडे मळ्यातील अवघ्या दहा वर्षांचा सिद्धांत शिरीष मोदी होय. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ’मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या सिंगिंग रिऍलिटी कार्यक्रमात त्याने सेमी फायनलपर्यंत धडक मारली आहे. आज सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत सिद्धार्थच्या घरी भेटीसाठी येणार आहेत.
सिद्धांतचे मूळ गाव इचलकरंजी. मुरदंडे मळ्यातील निवृत्त विद्युत अभियंता दत्तात्रय शंकर मोदी यांचा हा नातू. वडील शिरीष मोदी हे सुमारे 15 वर्षांपूर्वी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. दोन वर्षे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेथीलच एका कंपनीत नोकरीही मिळाली. 11 वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत मुलगा सिध्दांतच्या आवडी निवडीकडेही वेळ देत. त्याची गायनाची आवड हेरून चार वर्षांपूर्वी न्यूजर्सी येथील हेमंत कुलकर्णी यांच्याकडे गायनाच्या शिक्षणासाठी पाठवले. सिद्धांतने कुलकर्णी गुरुजींकडे गायनाचे प्राथमिक धडे गिरवले. त्याचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून असले तरी या दरम्यान आईकडूनच मराठी व संस्कृतचे बाळकडूही मिळाले. अनेक श्लोक त्याला मुखोद्गत आहेत. मायभूमीबद्दल अभिमान बाळगून असलेल्या सिद्धांतला भारताची ओढ लागली. वडील शिरीष यांनीही मुलाच्या गायनामध्ये असलेली प्रगती पाहून अमेरिका सोडण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या गायनाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी 2019 मध्ये पुणे येथे वास्तव्यास आले. सिद्धांतने पुण्यात अथर्वशीर्ष पठण स्पर्धेतही यशही मिळवले.
स्टार प्रवाह या वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद हा सिंगिंग रिऍलिटी कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. हजारो मुलांच्या व्हिडीओ ऑडिशनमधून केवळ 150 मुलांची प्राथमिक चाचणीसाठी निवड झाली. दुसऱया चाचणीत 50 जण निवडले गेले. त्यातूनही यश मिळवत टॉप टेन मध्ये सिध्दांत आपले स्थान बळकट केले. कार्यक्रमात सिद्धांतची धामधूम असून त्याच्या गायनामुळे त्याला रॉकस्टार अशी ओळख मिळाली. दिवसेंदिवस त्याची प्रगती होत असून श्रोत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या यशाबद्दल सिद्धांतचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.