अन्य तिघांचे कोरोंटाईननंतरचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह
प्रतिनिधी/कोल्हापूर
इचलकरंजीतील कोले मळा येथील चार वर्षीय बालक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्याच्यावर इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचा पहिला स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला लवकरच घरी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, उचत, कसबा बावडा येथील वृद्धा आणि कंटेनरमधील कर्नाटकातील पुरूषाचा पहिला फॉलोअप स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांचे दुसऱयांदा स्वॅब घेतले असून त्याचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.
सीपीआर प्रशासनाकडे सोमवारी रात्री उशिरा काही स्वॅब रिपोर्ट आले. 148 पैकी 143 स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच 5 स्वॅब रिपोर्ट तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहेत. कोले मळा येथील 4 वर्षाच्या बालकाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. उचत येथील महिला, कसबा बावडा मराठा कॉलनी येथील वृद्धा आणि मुंबईहून कंटेनरमधून कर्नाटकला निघालेल्या हसन येथील एक जण पॉझिटिव्ह होता. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या तिघांचे पहिले फॉलोअप स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दुसऱयांदा त्यांचे स्वॅब घेण्यात आले असून ते प्रलंबित असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.