तिघांना अटक ; दोघे पसार ; रोकडसह ५५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरात सुरु असलेल्या एका अवैध कॅसिनो आणि मटका अडुयावर पोलिसांनी छापा टाकला. कॅसिनोच्या दोघा मालकासह मटका घेणाऱ्या एका व्यक्तीला पकडून अटक केली. त्यांच्याकडून २२ हजार ६५० रुपयांची रोकडसठ एक पीसीयु, एक मोनिटर स्क्रीन, दोन टॅब, एक राऊटर, दोन मोबाईल हॅण्डसेट , एक की बोई , एक माऊस असा ५५ हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अटक केलेल्यांच्यामध्ये कॅसिनो मालक राकेश बजरंग दौडे ( वय २६ ) , राहुल प्रकाश व्हनुगरे ( वय ४० , दोघे रा . संग्राम चौक , इचलकरंजी ) तर मटका एजंट सागर भाऊसो शिंदे ( वय ३८ , रा . कुडचेनगर , तांबे माळ, इचलकरंजी ) याचा समावेश आहे. तर पसार झालेल्यांच्यामध्ये कॅसिनो मालक प्रविण सोनटक्के ( रा . लिंबू चौक ) आणि मटका बुकी मालक नवरंग देशमाने ( रा . घोडकेनगर , इचलकरंजी ) या दोघांचा समावेश आहे . पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे . ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी दुपारी केली आहे.
गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेशन रोडवरील डेक्कन चौकालगत एका घरात तिघा युवकांनी भागीदारीमध्ये अवैधपणे ऑनलाईन विन लकीच्या नावाखाली कॅसिनो जुगार अड्डा सुरु केला असल्याचे बातमीदाराकडून समजले . त्यावरुन या अडुयावर त्यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने छापा टाकला. यावेळी पोलिसांची चाहुल लागताच प्रविण सोनटक्के हा कॅसिनो मालक पसार झाला . तर राकेश दौडे , राहुल व्हनुगरे हे दोघे मिळून आले.
त्यांना अटक करीत या कॅसिनो अडुयावरील १४ हजार ७८० रुपयांची रोकडसह एक पीसीयु , एक मॉनिटर स्क्रीन , दोन टॅब , एक राऊटर , एक मोबाईल हॅण्डसेट एक की बोर्ड, एक माऊस असा ४७ हजार ५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला . याचदरम्यान या पथकाला कुडचेनगरातील तांबे माळ येथे मटका अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली . त्यावरून या अड्यावर छापा टाकला असता मटका घेणारा सागर शिंदे हा युवक मिळून आला . त्याला अटक करीत त्यांच्याकडून १ हजार ८७० रुपये आणि एक मोबाईल असा ७ हजार ८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला .