प्रतिनिधी /इचलकरंजी
येथील जवाहरनगर भागातील कोले मळा परिसरात नातलगाच्या अंत्यविधीसाठी येवून गेलेल्या विजापूर येथील वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याची माहिती मिळताच प्रशासनाने तेथील ५०० मीटरचा परिसर सील केला आहे. तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. सध्या प्रशासनाकडून या परिसरात सर्वेक्षण सुरु आहे.
येथील कोल्हापूर रोडवर असलेल्या साई मंदीर परिसरात २६ मार्च रोजी नातेवाईकाच्या अंत्यदर्शनासाठी विजापूर येथून काही लोक जीपने आले होते. त्यातील वृध्दाचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थानिक प्रशासनाला मिळाली. यानंतर प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत या ठिकाणचा ५०० मीटरचा परिसर सील केला आहे. त्यानंतर आशा सेविका, शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने या परिसरातील ४०० घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी ११ पथके कार्यरत आहेत.
दरम्यान, विजापूरची ती व्यक्ती ज्या कुटुंबीयांच्या संपर्कात आली होती, त्या घरातील १६ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून लवकरच अहवाल प्राप्त होईल. तसेच या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या १९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याबाबत सोमवारी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी परिसरात भेट देवून पाहणी केली तसेच कर्मचार्यांना सूचना केल्या.
मयत व्यक्ती दोन तासांसाठी इचलकरंजीत विजापूर येथील कोरोनामुळे मयत व्यक्ती नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी जीपने आली होती. त्याच्यासोबत आणखी १० जण आले होते. हे सर्वजण २ तास येथे थांबले व त्यानंतर निघून गेले. त्यातील एक महिला येथे थांबली असून तिच्यामध्ये कोणतीही लक्षणे नसली तरीही तिचा स्वाब परिक्षणासाठी पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडणार्या व अन्य नागरिकांनीही मास्क वापरणे आवश्यक आहे. पण काही नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिला आहे