प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजीतील कुडचे मळा परिसरात गेल्या काही दिवसापासून अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे काही युवक व महिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. उपचार सुरू असतानाच बुधवार (१६ जून ) रोजी हर्षद हणमंत तगारे या युवकाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाला होता. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी लोटतो न लोटतो, कुडचे मळ्यातील आणखी एका युवकाचा शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील विविध प्रभागात डेंग्यू सदृश्य रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत याची माहिती समजताच पालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. याच दरम्यान, कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हर्षल तगारे याचा बुधवारी मृत्यू झाला. या पाठोपाठ शुक्रवारी सौरभ लक्ष्मण गणपते (वय २५) याचा मृत्यू झाला. त्यामुळे पालिका प्रशासनाला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबरोबर डेंग्यूच्या साथीचे उपाययोजना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.