प्रतिनिधी/ इचलकरंजी
येथे एका कारमधून एक लाखाच्या बनावट विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क व पोलीसांनी संयुक्तरित्या केली. याप्रकरणी आशिष आप्पासाहेब लाड (वय 40), प्रितम गजानन यमगेकर (वय 25, दोघे रा. निप्पाणी, जि. बेळगावी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
इचलकरंजी येथील नदीवेस नाका परिसरात गस्त घालत असताना शिरदवाड रोडवरून जाणाऱया एका कारमधून बनावट विदेशी मद्य वाहतूक सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार संबंधीत कारची झडती घेतली असता, 336 बनावट विदेशी मद्याच्या बाटल्यांसह 1 लाख 1 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या. यावेळी मद्यवाहतूक करणारे आशिष लाड व प्रितम यमगेकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्केचे विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक गणेश पाटील, पोलीस उपाधिक्षक गणेश बिरादार, गावभागचे प्रभारी पोलीस निरिक्षक गजेंद्र लोहार, पी. आर. पाटील, जी. एच. हजारे, विलास पवार, सुभाष कोले यांच्या पथकाने केली.