अनियमिता झाल्याने कामे निकृष्ट झाल्याचा आरोप
इचलकरंजी प्रतिनिधी
येथे पालिकेच्यावतीने झालेल्या रेन वॉटर हार्वेस्टींगच्या कामामध्ये भ्रष्टाचार व अनियममिता झाली असून सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. या कामाची तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल आल्याशिवाय मक्तेदाराचे बील अदा करू नये, तसेच त्रुटी ठेवणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रदीप ठेंगल यांना दिले आहे.
निवेदनात, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील रेन वॉटर हार्वेस्टींग च्या कामांना सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूरी मिळाली आहे. या कामावर 70 लाख 70 हजार 913 इतका खर्च होणार असून भूगर्भामध्ये पाणी साठवून भूजल पातळी वाढावी हा या योजनेचा हेतू आहे. पण पालिकेने या कामाचा कार्यादेश देताना त्यावर कोणत्याही तारखेचा उल्लेख केला नसुन कामाचा कालावधी 90 दिवसांचा घातला आहे. कार्यादेशावर तारखेचा उल्लेख नसल्याने हा कालावधी कधी पुर्ण होणार अथवा झाला आहे. याबाबत काहीही समजून येत नाही. ही त्रुटी जाणीवपूर्वक झाली आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पालिकेने हा करार करत असताना स्टँपवरील तारखेपासून 90 दिवसाचा कालावधी ग्राह्य धरून पुढील प्रत्येक दिवसास या कामाच्या मक्तेदारास प्रतिदिन 100 रूपये प्रमाणे दंड आकारणी करण्याची तरतूद आहे. रेन वॉटर हार्वेस्टींगची काही कामे पुर्ण झाली असे पालिकेचा पाणीपुरवठा विभाग सांगत असला तरी ही कामे मुळ एस्टिमेटप्रमाणे झाली नसून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे कामाच्या मुळ हेतूलाच हरताळ फासला आहे. केवळ मक्तेदार व अधिकाऱयांचे उखळ पांढरे करण्यासाठीच या योजनेचा सोपस्कार पार पाडला जात आहे.
तरी या कामाची तातडीने तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल मागवावा, तोपर्यंत कामाचे कोणतेही देयक मक्तेदारास आदा करण्यात येवू नये. तसेच या कामाचा कार्यादेश देताना व करारनामा करताना ज्या अधिकाऱयांनी जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. असे न केलेस कामातील एकूण भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत जिल्हाधिकाऱयांकडे दाद मागणार असल्याचे बावचकर यांनी सांगितले आहे.