प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजीयेथील लालनगरमधील रेशन धान्य दुकानदार व ग्राहकांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी होऊन याचे रूपांतर हाणामारीत झाले. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. येथील लालनगरमध्ये रेशन धान्य दुकान आहे. शनिवार २५ एप्रिलपासून केसरी शिधापत्रिकाधारकानाही ८ रुपये व १२ रुपये प्रमाणे गहू व तांदूळ देण्यास सुरुवात झाल्याने याठिकाणी ग्राहकांची गर्दी वाढली होती. दरम्यान, किरकोळ कारणावरून दुकानदार व काही ग्राहकांमध्ये वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाली. यामध्ये दुकानातील टेबल व खिडक्यांची तोडफोड झाली. लॉकडाऊनमुळे रेशन वितरणाबाबत नागरिकांच्या भावना आधीपासूनच तीव्र आहेत. याप्रकारानंतर त्याचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. गावभाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, चंदूर रोड येथील शाहू नगर भागातील रेशन धान्य दुकान सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होते. रेशन धान्य दुकान सुरू करण्याची वेळ सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत निश्चित केली असतानाही हे दुकान विहित वेळेत न उघडपणे पहाटे पासूनच रांगा लावून बसलेल्या ग्राहकांना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशा प्रकाराकडे पुरवठा अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.