प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील सांगली रोड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या स्वागत समारंभावेळी पोलिसांनी छापा टाकत 25 नागरिकांची परवानगी असताना तब्बल दोनशे लोक त्या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्याने ही कारवाई केली.
सांगली रोडवर एक मोठे हॉटेल असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. त्यावेळी एका लग्नसोहळ्याचा स्वागत समारंभ त्या ठिकाणी सुरू असल्याचे दिसून आले.तब्बल 200 हून अधिक नातेवाईक व मित्रमंडळी यांची त्याठिकाणी उपस्थिती होती. अचानक पोलिसांनी सर्वांवरच सुरू केलेल्या कारवाईमुळे समारंभाच्या ठिकाणी एकच तारांबळ उडाली. याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू झाले आहे. अलीकडच्या काळात पोलिसांनी केलेली ही दुसरी कारवाई आहे.