प्रतिनिधी / इचलकरंजी
पोलिसांनी बेकायदेशीरपणे विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या रिक्षासह ४५ हजार २६६ रुपये किंमतीचे विविध कंपनीची विदेशी दारुचे आठ बॉक्स असा सुमारे १ लाख ३६६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी सांयकाळी केली. या प्रकरणी रिक्षा चालक रफिक सैफुद्दिन सय्यद ( वय ४०, रा . गल्ली नंबर ४ , हनुमाननगर , जवाहरनगर , इचलकरंजी ) याला अटक केली आहे .
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, गावभाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक बुधवारी दुपारी हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी या पथकाला शहरातील नगरपालिकाची जुनी इमारत ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावरून रिक्षामधून अवैधपणे विदेशी दारुची वाहतुक होणार असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरुन या पथकाने या मार्गावर सापला लावून येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षाची तपासणी सुरु केली.
याचदरम्यान पाच वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरुन भरधावपणे येणारी रिक्षा या पथकाला दिसली. त्यांनी संशयावरून या रिक्षाच्या चालकाला रिक्षा थांबविण्याचा इशारा केला. तरी देखील तो रिक्षा न थांबविता पुढे निघून जावू लागला. त्यावेळी पथकातील पोलिसांनी पाठलाग करुन रिक्षा पकडली. रिक्षाची झडती घेतली असता मागील सिट घाली लपवून ठेवलेले विविध कंपनीची विदेशी दारुचे आठ बॉक्स आढळून आले. ही दारु जप्त करून रिक्षा चालक रफिक सय्यद याला अटक केली .