प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन पालिका सभेचा अहवाल मागवणार असून याबाबत शुक्रवार २० रोजी पुन्हा चर्चा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी इचलकरंजी पालिका नगरसेवकांच्या शिष्टमंडळास सांगितले. यावेळी विरोधी नगरसेवकांनी सभेतील ठराव रद्द करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले. यामुळे आता याबाबत काय निर्णय होतो, याची उत्सुकता आहे.
शुक्रवार दि. ६ रोजी पार पडलेली पालिकेची ऑनलाईन सभा विविध कारणांनी गाजली. सभा ऑफलाईन घेण्याची विरोधकांची मागणी नगराध्यक्षांनी धुडकावल्यावर विरोधकांनी पालिकेत गदारोळ केला. त्यानंतर ऑनलाईन सभेत तांत्रिक दोषामुळे मत मांडता येत नसल्याची मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. त्याच्या पुढचा टप्पा म्हणून विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी (जांभळे गट), ताराराणी आघाडी गटाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन दिले. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, मदन झोरे, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, नितीन जांभळे, संजय कांबळे आदींचा समावेश होता.