इचलकरंजीचे मुख्याधिकारी कोरोनाबाधित झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी येथील पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्याधिकारी संतोष खांडेकर हे कोरोनाबाधित झाल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा आदेश दिला आहे. पाटील यांनी यापुर्वी इचलकरंजी पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.
इचलकरंजी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर व त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल शनिवार १ रोजी पॉझिटीव्ह आला. सध्या इचलकरंजी येथे कोरोनाचा समुह संसर्ग मोठया प्रमाणात वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. त्यातच मुख्याधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ माजली. यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एका आदेशान्वये पालिका मुख्याधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत कोल्हापुरचे जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे सोपवला आहे. दीपक पाटील यांनी यापुर्वी इचलकरंजी पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच त्यांना या शहराची माहिती असल्याने त्यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. पाटील यांच्याकडून सोमवार ३ ऑगस्ट रोजी पदाचा कार्यभार स्विकारण्याची शक्यता आहे.