जखमी बन्नेविरोधी विनयभंगचा गुन्हा नोंद
इचलकरंजी/ प्रतिनिधी
शहापूर विठ्ठलनगरातील डॉ. विवेक सदाशिव बन्ने यांच्यावर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करून त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची चेन, किंमती मोबाईल असा हजारो रुपयांचा ऐवज हिसकावून घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी विद्यमान नगरसेवक तानाजी हराळेचा मुलगा, जावाईसह चौघांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. हे चौघेही पसार झाल्याने पोलिसांनी त्यांचा मोबाईल कॉल डिटेलद्वारे शोध सुरू केला आहे. या दरम्यान जखमी डॉ. बन्ने यांच्या विरुद्ध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या विवाहीतेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी शनिवारी शहापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
डॉ. बन्ने यांचा चंदुर आभार फाटा परिसरात खासगी दवाखाना आहे. 26 फेब्रुवारी रोजी रात्री दवाखाना बंद करून चारचाकीतून घरी येत होते. यावेळी त्यांना विद्यमान नगरसेवकाचा मुलगा नितीन तानाजी हराळे, जावई अन्य दोन अशा चौघांनी कबनुर-चंदुर मार्गावरील ओढ्यालगत अडविले. त्यांच्या चारचाकीची तोडफोड करीत खुनी हल्ला केला. या हल्ल्यावेळी डॉ. बन्ने यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची चेन, 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा हजारो रुपयांचा ऐवज हिसकावून घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात चौघांच्यावर जबरी चोरी, तोडफोड, मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर चौघेही पसार झाले असून पोलिसांनी कसुन शोध सुरू केला आहे.
या दरम्यान जखमी डॉ. बन्ने यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका विवाहीतेशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या घटनेची शहापुर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. गुन्ह्याची चाहुल लागताच डॉ. बन्ने पसार झाले आहेत. पोलिस त्याचा शोध सुरू आहे. डॉ. बन्ने यांच्या मोबाईलमध्ये अनेक अक्षेपार्ह्य संदेश, चित्रफित असल्याच्या संशयावरून हल्लेखोरांनी त्याचा मोबाईल पळवून नेला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.