इचलकरंजी/ प्रतिनिधी
येथील कुडचे मळ्यातील एकाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. यामुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले असून प्रशासन सतर्क झाले आहे. या संदर्भात पालिकेत नगराध्यक्षांनी तात्काळ बैठक घेऊन वाढती कोरोना बाधितांची आकडेवारी लक्ष्यात घेता शहरात पूर्ण क्षमतेने पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय गुरुवारी बोलावलेल्या बैठकीत घेतला जाणार आहे.
कुडचे मळा येथील 55 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये क्रिगिस्तान देशातून आलेल्या विद्यार्थ्यासह एका कापड व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यावर डेंग्यू सदृश्य आजारांवर उपचार करण्यासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना केलेल्या कोरोना चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या या चाचणीची पुन्हा शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. दरम्यान कुडचे मळा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून आतापर्यंत 9 जणांचे स्वाब घेण्यात आले असून अजून काहींचे स्वाब घेण्याचे काम सुरू आहे. उर्वरित दोघां कोरोना बाधितांची संपर्कात आलेल्यांची चौकशी करण्याचे काम सुरू आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा शासकीय तपासणी अहवाल आल्यानंतर दातार मळा परिसर सील करण्यात येणार की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.