ईसीजी आणि रक्तचाचणीही करणारा यंत्रमानव : मास्क न घातल्यास विचारणा
कोविड-19 ची चाचणी करू शकणारा रोबोट इजिप्तमध्ये विकसित करण्यात आला आहे. हा रोबोट रुग्णाचे तापमान तपासण्यासह मास्क न घालणाऱयांना ताकीदही देतो. कोविड चाचणीसह हा रोबोट इकोकार्डियोग्राम (ईसीजी), रक्ततपासणी आणि एक्सरेही काढू शकतो. चाचणीचे परिणाम रोबोटवरील स्क्रीनवर पाहता येतात.
मानवी रुप
रोबोटची निर्मिती कैरोतील एका खासगी रुग्णालयात करण्यात आली आहे. याचे नाव सीरा-03 ठेवण्यात आले आहे. हा रोबोट विषाणूचे संक्रमण रोखण्यास मदत करणार आहे. याचा चेहरा आणि हात माणसांसारखा असल्याने रक्ततपासणी आणि ईसीजीही करू शकतो अशी माहिती रोबोटचे निर्माते महमूद अल-कौमी यांनी दिली आहे.
रुग्णाची भीती घालविण्याचा प्रयत्न
पूर्णपणे माणसांसारखा दिसणारा रोबोट तयार करत रुग्णाची भीती घालविण्याचा प्रयत्न केला आहे. एखादा बॉक्स अवतीभोवती फिरत असल्याची भावना रुग्णात होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. रुग्णांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने आनंदी असल्याचे अल-कौमी यांनी सांगितले आहे.
चाचणीची कार्यपद्धत
कोविड चाचणी करण्यासाठी सीरा-03 रुग्णाची हनुवटी वर करून एका हाताने तोंडातून स्वॅब मिळवितो. रोबोटचा आतापर्यंत वापर लोकांचे तापमान तपासण्यासाठी केला जात होता, अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख अबू बक्र अल-मिही यांनी दिली आहे.
संक्रमणाचा धोका कमी
हा रोबोट गर्दीयुक्त ठिकाणी म्हणजेच बँक, विमानतळ आणि स्थानकांवर ठेवला जाऊ शकाते. या रोबोटच्या वापरामुळे संक्रमण फैलावण्याचा धोका कमी होणार आहे. हा रोबोट काही अंतरावरून नियंत्रित केला जाऊ शकतो.