उपांत्य लढतीत पोलंडच्या हुर्काझवर मात
वृत्तसंस्था/ विम्बल्डन
इटलीच्या मॅटेव बेरेटिनीने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना पोलंडच्या हय़ुबर्ट हुर्काझचे आव्हान संपुष्टात आणले. विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा इटलीचा तो पहिलाच खेळाडू आहे. अग्रमानांकित जोकोविच व कॅनडाचा डेनिस शापोव्हॅलोव्ह यापैकी एकाशी त्याची जेतेपदाची लढत रविवारी होईल.
सातवे मानांकन मिळालेल्या बेरेटिनीने फेडररला हरविणाऱया चौदाव्या मानांकित हुर्काझवर चार सेट्सच्या लढतीत 6-3, 6-0, 6-7 (3-7), 6-4 अशी मात करीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. हुर्काझदेखील इथवर मजल मारणारा पोलंडचा पहिलाच खेळाडू आहे. बेरेटिनीने पहिला सेट 6-3 असा घेतला आणि दुसऱया सेटमध्ये त्याने हुर्काझला अजिबात संधी न देता 6-0 असा एकतर्फी जिंकला. तिसऱया सेटमध्ये हुर्काझने झुंजार खेळ करीत टायब्रेकरपर्यंत सेट लांबवला आणि हा सेट जिंकून सामना चौथ्या सेटवर नेला. पण हुर्काझला हा जोम या सेटमध्ये टिकविता आला नाही आणि बेरेटिनीने 6-4 असा हा सेट घेत अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले. 1976 मध्ये ऍड्रियानो पेनाटाने पेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकत ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिला इटालियन टेनिसपटू होण्याचा मान मिळविला होता. आता या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी बेरेटिनीला मिळाली आहे. पुरुष दुहेरीत चौथ्या मानांकित होरासिओ झेबालोस व मार्सेल ग्रॅनोलर्स यांनी सायमन बोलेली व मॅक्झिमो गोन्झालेझ यांच्यावर 6-4, 6-4, 7-6 (7-3) अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. दुसऱया उपांत्य लढतीत अग्रमानांकित निकोला मेक्टिक व मॅट पॅव्हिक यांनी राजीव राम व जो सॅलिसबरी या सहाव्या मानांकित जोडीवर 7-6 (8-6), 6-3, 6-7 (2-7), 7-6 (7-5) अशी चुरशीच्या लढतीत मात केली. झेबालोस-ग्रॅनोलर्स व मेक्टिक-पॅव्हिक यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल