रोम/ वृत्तसंस्था
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या हार्डकोर्ट पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा नवोदित टेनिसपटू लोरेंझो मुसेटीने आपली विजयी घोडदौड कायम राखत जपानच्या सिडेड खेळाडू निशीकोरीला पराभवाचा धक्का दिला.
गुरूवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात 18 वर्षीय मुसेटीने निशीकोरीचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या सोळा खेळाडूत स्थान मिळविले. या स्पर्धेत मुसेटीने पहिल्या फेरीतील सामन्यात स्वीसच्या तीनवेळा ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविणाऱया वावरिंकाचा पराभव केला होता. या स्पर्धेत मुसेटीला वाईल्डकार्डद्वारे प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मुसेटी आणि जर्मनीचा कोफेर यांच्यात पुढील फेरीचा सामना होईल. कोफेरने फ्रान्सच्या मोनफिल्सचा पराभव केला होता.
दुसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात फ्रान्सच्या हंबर्टने इटलीच्या फॉगनेनीचा 7-5, 7-6 (7-4), कॅनडाच्या 12 व्या मानांकित शेपोव्हॅलोव्हने मार्टिनेझचा 6-4, 6-4, अर्जेटिनाच्या आठव्या मानांकित शुवार्झमनने मिलमनचा 6-4, 7-6 (7-1), पोलंडच्या हुरकेझने रूबलेव्हचा 7-6 (8-6), 3-6, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.