वृद्धांची संख्याही मोठी : मूळ पडेल येथील दीक्षित दाम्पत्य म्हणाले, इटली आता सावरतेय!
प्रशांत वाडेकर / देवगड:
चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाचा प्रसार संपूर्ण जगात झाला. आज अनेक राष्ट्रे कोरोनाशी लढा देत आहेत. इटली देशालाही कोरोनाशी मोठा लढा द्यावा लागला आहे. इटलीमध्ये वृद्धांची असलेली मोठी संख्या व भारताप्रमाणे असलेली कुटुंबप्रधान संस्कृती यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने झाला. मात्र, इटली प्रशासनाने योग्यवेळी उपाययोजना सुरू केल्याने आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे इटली आता कोरोनातून सावरतेय, अशी माहिती मूळ देवगड तालुक्यातील पडेल येथील व नोकरीनिमित्त इटलीमधील मिलान या शहरात राहणाऱया दीपक व सौ. विदुला दीक्षित या दाम्पत्याने दिली.
इटलीमधील कोरोनाबाबतच्या परिस्थितीबाबतची माहिती देताना दीक्षित दाम्पत्य म्हणाले, इटलीमध्ये 8 मार्चपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाबाबत सुरुवातीला चीनकडून जास्त माहितीही मिळाली नव्हती. त्यामुळे नेमकी उपाययोजना काय करावी, हा प्रश्न निर्माण झाला. कोरोनाची जास्त लागण ही वयोवृद्धांना झाली. इटलीमध्ये वृद्धांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. भारताप्रमाणे येथेही कुटुंबप्रधान संस्कृती असल्याने लोकांची नातेवाईकांकडे ये-जा असते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने झाला. मात्र, ही गोष्ट इटली प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर इटली प्रशासनाने तात्काळ लॉकडाऊन केले. 8 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले असून येथील जनताही ते काटेकोरपणे पाळत आहे.
इटली प्रशासनाकडून होताहेत योग्य उपाययोजना
आम्ही इटलीतील मिलान येथील दक्षिणपूर्व या भागात राहतो. मिलान या शहरात सुमारे 15 हजार रुग्ण होते. इटलीमध्ये एक लाख 68 हजार 941 कोराना बाधित होते. त्यात 22 हजार 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीत युरोपीय राष्ट्रांपेक्षा इटलीची परिस्थिती चांगली आहे. इटली येथील प्रशासनाने कठीण काळात केलेले प्रयत्न खरोखरच देशाच्या हितासाठी उपयोगी ठरले आहेत. इटली हे जगातील सर्वात चांगल्या वैद्यकीय सुविधा देणारा देश आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार चांगल्याप्रकारे होत आहेत. रुग्णांमध्ये सुधारणा असून आता नवीन रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे. अजूनही येथे लॉकडाऊन सुरू आहे. येथे लॉकडाऊनमध्ये इमर्जन्सीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे. त्यासाठी शासनाचा एक डिक्लरेशन फॉर्म भरावा लागतो. त्यानंतरच बाहेर पडायला मिळते.
आठ दिवसांनी एकदा घराबाहेर
शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे आठ दिवसांचे सामान एकदाच आणून घरात थांबावे लागते. आठ दिवसांनंतर पुन्हा आवश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडायचे. लॉकडाऊनमुळे ऑफिस बंद असल्याने घरातच राहून काम रण्यासास कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येथे ‘वर्क फ्रॉम होम’ येथे सुरू आहे. मी देखील सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खोली बंद करून ऑफिसचे काम करतो.
येथील लोकच शिस्त पाळतात
इटलीमधील लोक खूप शिस्तप्रिय आहेत. त्यामुळे लोकांनीच येथे शिस्त पाळून शासनाला सहकार्य केले आहे. येथे सर्व लोक सोशल डिस्टन्स ठेवूनच राहत आहेत. वयोवृद्धांची संख्या जास्त असल्याने शासन त्यांची जास्त काळजी घेत आहे.
सूर्यनमस्कार व नियमित व्यायाम
घरात सकाळी उठल्यानंतर सूर्यनमस्कार करतो. योगासने करून स्वत:ला फिट ठेवण्याचे काम करतो. प्रतिकारशक्ती वाढविणारे आहार घेतो. भारतीय संस्कृती आम्ही येथेही जपतो आहोत, असेही दीक्षित म्हणाले.
भारताचे कौतुकच!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने सुरुवातीपासून योग्य निर्णय घेतले आहेत. भारताची लोकसंख्या विचारात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय अत्यंत योग्य आहेत. भारताने योग्य पाऊल उचलल्यामुळे कोरोनावर कंट्रोल करणे शक्य होऊ लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही घरी बसलोय, तुम्हीही घरीच रहा!
दीक्षित दाम्पत्य आवाहन करताना म्हणाले, आमची आमच्या भारतीय बांधवांना एकच विनंती आहे, कोरोनाला गांभिर्याने घ्या. कोरानाची साखळी तोडायची असेल, तर घरीच थांबा. बाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा. शासन चांगल्या उपाययोजना करीत आहे. शासनाला सहकार्य करा.