वृत्तसंस्था/ रोम
रविवारी इटलीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना इंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेतेपद मिळविल्यानंतर इटलीमध्ये हजारो शौकिनांनी विजयोत्सव साजरा केला. जेतेपदाच्या जल्लोषामध्ये अनेक जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
इटलीमध्ये रविवारी रात्रभर प्रमुख मार्गावर फुटबॉल शौकिनांनी गर्दी करत विजयोत्सवाचा जल्लोष केला. दरम्यान एक 22 वर्षीय युवक विजयोत्सवात सामील होण्यासाठी जात असताना सिसिलीमधील कॅलटेगिरोनी येथे झालेल्या कार अपघातात ठार झाला. मिलान शहरामध्येही 15 व्यक्ती जखमी झाल्या असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दारूसामानाची आतषबाजी करताना एका व्यक्तीने आपल्या हाताची तीन बोटे गमविली आहेत. 1968 नंतर इटली संघाने पहिल्यांदाच युरो चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.