वृत्तसंस्था/रोम
सात महिन्यांच्या ब्रेकनंतर स्पेनचा राफेल नदाल पुनरागमन करण्याच्या तयारीत असून पुढील आठवडय़ात होणाऱया इटालियन ओपन स्पर्धेत तो सहभागी होणार आहे.
‘फोरो इटॅलिको हे माझ्यासाठी खास ठिकाण असून यावर्षी त्याला विशेष महत्त्व आहे. कारण बऱयाच काळाच्या विश्रांतीनंतरची ती माझी पहिली स्पर्धा असेल,’ असे नदालने व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले. ही स्पर्धा त्याने विक्रमी 9 वेळा जिंकली असून मंगळवारी स्पर्धेची माहिती देताना हा व्हिडिओ सादर करण्यात आला. कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे नदालने अमेरिकन ओपन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. गेल्या फेब्रुवारीत मेक्सिकोतील ऍकापुल्को स्पर्धेत त्याने शेवटचा भाग घेतला होता आणि त्यात त्याने जेतेपदही मिळविले होते. इटालियन ओपन स्पर्धा 14 ते 21 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. प्रतिवर्षी ही स्पर्धा मेमध्ये होते. पण यावेळी ती कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती. अमेरिकन स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आलेला जोकोविचही या स्पर्धेत खेळणार आहे. पहिल्या 20 पैकी 19 मानांकित खेळाडूंनी या स्पर्धेतील सहभाग निश्चित केला आहे.