वृत्तसंस्था/ मोन्झा, इटली
येथे झालेल्या इटालियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत मॅक्लारेनच्या डॅनियल रिकार्दोने जेतेपद पटकावले तर त्याचाच संघसहकारी लँडो नॉरिसने दुसरे आणि मर्सिडीजच्या व्हाल्टेरी बोटासने तिसरे स्थान मिळविले. चॅम्पियनशिप रेसमध्ये चढाओढ सुरू असणाऱया मर्सिडीजचा लेविस हॅमिल्टन व रेड बुलचा मॅक्स व्हर्स्टापेन यांच्या कार्सची पहिल्या धोकादायक वळणावर टक्कर झाल्याने ते या शर्यतीतून बाहेर पडले. नंतर एफआयएने व्हर्स्टापेनला तीन ग्रीड स्थानांचा दंडही केला आहे.
2012 नंतर मॅक्लारेनने जिंकलेली ही पहिलीच शर्यत आहे तर रिकार्दोने 2018 नंतर जिंकलेली पहिलीच शर्यत आहे. त्यावर्षी रेड बुलकडे असताना त्याने शर्यत जिंकली होती. रिकार्दोने आजवरच्या कारकिर्दीत जिंकलेली ही आठवी शर्यत आहे. त्याने पहिल्या रांगेतून या शर्यतीला सुरुवात केली आणि व्हर्स्टास्पेनला मागे टाकत आघाडी घेतली. त्याने सर्वात वेगवान लॅपचा बोनस गुणही मिळविला. हॅमिल्टन व व्हर्स्टास्पेन यांच्या गाडय़ांची टक्कर झाल्याने ते शर्यतीबाहेर पडले. मात्र व्हर्स्टापेनची 5 गुणांची आघाडी कायम राहिली.