वृत्तसंस्था/ मिलान
डब्ल्यूटीए टूरवरील इटालियन खुली महिलांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा रोममध्ये 14 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा 21 सप्टेंबरपासून घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण काही स्पर्धांच्या तारखांमध्ये घोळ होत असल्याने आता इटालियन टेनिस स्पर्धा 14 सप्टेंबरपासून घेतली जाईल, असे स्पर्धा आयोजकांनी जाहीर केले आहे.
सदर स्पर्धा क्ले कोर्टवर खेळविली जाणार आहे. प्रत्यक्षात ही स्पर्धा 11 मे पासून घेण्याचे ठरले होते. दरम्यान, इटलीतील कोरोना परिस्थितीमुळे ही महिलांची टेनिस स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. आता न्यूयॉर्कमध्ये 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरदरम्यान अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा खेळविली जाणार आहे. त्यानंतर पॅरिसमध्ये प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला 27 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. कोरोना महामारी परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने डब्ल्यूटीए आणि एटीपी टूरवरील सर्व टेनिस स्पर्धा तहकूब किंवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. 5 महिन्यांच्या कालावधीनंतर गेल्या आठवडय़ात इटलीतील पालेर्मो महिलांची पहिली टेनिस स्पर्धा झाली होती.