वृत्तसंस्था/ रोम
जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने येथे आगामी होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील इटालियन खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. सदर माहिती स्पर्धा आयोजकांनी सोमवारी दिली आहे.
या महिन्याच्या प्रारंभी माद्रीद येथे झालेल्या टेनिस स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात खेळताना ओसाकाला ही दुखापत झाली होती. सदर दुखापत पूर्ण बरी होण्यास काही दिवस लागणार असल्याने ओसाकाने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चारवेळा ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपद मिळविणारी ओसाका आता 22 मे पासून सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत 24 वर्षीय ओसाका सध्या 38 व्या स्थानावर आहे. मियामी टेनिस स्पर्धेत ओसाकाने अंतिम फेरी गाठली पण तिला पोलंडच्या स्वायटेककडून पराभव पत्करावा लागला. रोममध्ये होणाऱया इटालियन टेनिस स्पर्धेत आता ओसाकाच्या जागी स्पेनच्या नुरीया डायसचा समावेश करण्यात आला आहे.