रत्नागिरीत ग्रामीण भागात आजही होतेय ‘बळी राजाचे स्मरण व पूजा
शेतकऱ्यांच्या घरी जपली जातेय विडे भरण्याची पथा
प्रतिनिधी / रत्नागिरी
‘देव दिपावली’ सण म्हणजे तमाम शेतकऱ्यांचा जिवाभावाचा सण. सम्राट बळी राजाचे यादिवशी पूजा व स्मरणाचा दिवस. त्याकाळी या राजाच्या राज्यात मानपानाच्या अधिकाऱ्यांच्या जागाही शेतकऱ्यांना मिळत होत्या. सारी सत्ता त्यांच्या हातात होती. बळीच राज्य आणि समृद्धी नटलेले राज्य होते. स्त्री-पुरुष समानता होती ते बळीराज्य समता व समृद्धी युक्त होते. म्हणून आज शेकडों वर्षांनंतरही बळीराजाची आज सारे कष्टकरी, शेतकरी स्मरण करतात. ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी आरोळी देत मंगळवारी कोकणात विशेषत रत्नागिरी जिल्हाभरात गावा गावात देवदिपावली सण साजरा झाला.
कोकणातील विशेषत रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात देवदिपावलीचा सण परंपरेनुसार व श्रध्देने साजरा केला जातो. मंगळवारी देवदिपावली दिवशी सम्राट बळीराजाचे स्मरण करत घरात विडे भरणे तसेच ठिकठिकाणी ग्रामदेवालयातही देवांना रुपे लावून विडे भरण्याचा कार्यकम उत्साहात पार पडला. देव दीपावली हा कुणबी समाज शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण मानला जातो. बळीराजा हा दानी होता आणि उदार होता. महासम्राट बळी राजाच्या कल्याणकारी राज्याची प्रतीक्षा करत आजही कष्टकरी प्रजा (कुणबी बहुजन) विडा भरण्याच्या माध्यमातून आपल्या राजा विषयी कृतज्ञता व्यक्त करताना दिसून येतात.
दिवाळीच्या (नरक चतुर्दशी) नंतर म्हणजेच सुमारे महिनाभराच्या कालावधीनंतर देवदिपावली साजरी होते. यादिवशी ग्रामीण भागात शेतकरीवर्गात घरोघरी या उत्सवाची मोठी लगबग असते. सकाळी लवकर उठून घरोघरी आंबोळीचे पदार्थ बनविले जातात. त्यानंतर गोठ्यात दिवा-बत्ती व गुरांना ओवाळणी करून त्यांना आंबोळीही खाऊ खातली जाते. त्यानंतर शेतकरी आपल्या घरांमध्ये देवाच्या नावाने विडे भरण्याचा कार्यकम पार पाडला जातो. जिल्ह्यामध्ये काही गावोगावी घरात सामुदायिक तर काही ठिकाणी वैयक्तिक अशा स्वरूपात विडा भरण्याचा कार्यकम ग्रामस्थ साजरा झाला.
विडे भरण्याची पध्दतीः
शुभ्र वस्त्रावर गादी तयार करून त्यावर पानांचे विडे मांडणी केली जाते.
विडे भरताना घरात सर्वांना सुख-समृध्दीसाठी गाऱहाणे घातले जाते.
सम्राट बळीराजाचे स्मरण म्हणून ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ आळवणी.
त्यानंतर सर्व उपस्थितांना विडे वाटप केले जाते.
घरातील विडयातील एक विडा ग्रामदेवतेच्या नावाने काढुन ग्रामदेवालयात नेला जातो.