नैरोबी –
पश्चिमी इथियोपियात दोन गटात उडालेल्या संघर्षात 200 हून अधिक जणांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. इथियोपियातील मानव हक्क आयोगाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. बंडखोर ओरोमो लिबरेशन आर्मीने 150 जणांची हत्त्या केली आहे असे कळते. देशात ओरोमो आणि आम्हारा इथनिक गटामध्ये गेले दोन दिवस मोठा संघर्ष उफाळून आला आहे. ओरोमीया भागात पूर्व वोल्लेगा प्रांतात सदरची घटना घडली आहे. जवळच्या नदीपात्रात अनेकांचे मृतदेह आढळून आले होते नंतर त्यांचे दहन करण्यात आल्याचे प्रत्यदर्क्षीने सांगितले. पूर्व वोल्लेगा भागात आम्हारा रहिवाशांची मोठी संख्या असून पिकाऊ शेतजमिनीवरून दोन गटात संघर्ष उडाल्याचे सांगितले जात आहे. दोन गटातील संघर्षात अनेक घरांचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सरकार सदरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते.