आयटी कंपन्यांची कामगिरी मजबुतीकडे ः कोरोना-लॉकडाऊननंतर स्थितीत सुधारणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दिग्गज आयटी सर्व्हिसमधील कंपन्या इन्फोसिस आणि विप्रो यांचे डिसेंबर तिमाहीमधील अहवाल सादर करण्यात आले आहेत. यामध्ये इन्फोसिसचा निव्वळ नफा हा वर्षाच्या आधारे 16.6 टक्क्यांनी वाढला आहे तर दुसऱया बाजूला विप्रोचा नफा वर्षाच्या आधारे 30.8 टक्क्यांनी वधारला आहे. आयटी क्षेत्रातील अन्य दिग्गज कंपन्यांमध्ये टीसीएसने मागील काही दिवसांमध्ये आपले तिमाही अहवाल सादर केले आहेत. टीसीएसचा वर्षाच्या आधारे निव्वळ नफा हा 7.2 टक्क्यांनी वाढल्याची नोंद केली आहे.
डिसेंबरचा तिमाही आयटी सर्व्हिसमधील कंपन्यांसाठी काहीसा कमजोर असल्याचे मानले जाते. कारण जगभरात याच दरम्यान काही ठिकाणी अधिकच्या सुट्टीचा कालावधी राहिलेला आहे. दुसरी बाब म्हणजे कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनच्या प्रभावातून काहीसा दिलासा मिळाल्याने पुन्हा कंपन्यांच्या कामगिरीने तेजी पकडली आहे. यामुळे तीन प्रमुख आयटी सर्व्हिसमधील कंपन्यांनी डिसेंबर तिमाहीत वर्षाच्या तुलनेत मजबूत कामगिरीची नोंद केली आहे.
डिजिटल सेगमेंटचा हिस्सा 50 टक्क्यांवर
इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा निव्वळ नफा हा डिसेंबर तिमाहीमध्ये वर्षाच्या आधारे 16.6 टक्के आणि तिमाही दरानुसार 7.3 टक्क्यांनी वधारुन 5,197 कोटी रुपयांवर राहिला आहे. कंपनीचा महसूल याचदरम्यान वर्षाच्या आधारे 12.3 टक्क्यांनी मजबूत राहिला आहे. याचदरम्यान कंपनीच्या एकूण महसूलात डिजिटल महसूलाचा वाटा 50 टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे.
विप्रोचा निव्वळ नफा वधारला
आयएफआरएसनुसार डिसेंबर तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफा हा वर्षाच्या कालावधीनुसार 20.8 टक्क्यांनी वाढून 2,966.7 कोटी रुपयांवर राहिला आहे. जो एक वर्षाच्या समान कालावधीत 2,455.8 कोटांवर राहिला होता. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा हा 20.3 टक्क्यांनी वधारला आहे. विप्रोचे प्रति समभाग उत्पन्न वर्षाच्या आधारे 20.7 टक्क्यांनी वधारले आहे. कंपनीचा ऑपरेटिंग कॅश फ्लो 4,430 कोटी रुपयांवर राहिला आहे. जो निव्वळ नफा 149.4 टक्क्यांवर आहे. ऑपरेटिंग कॅश फ्लो वर्षाच्या आधारे 45 टक्क्यांनी वाढला आहे.