नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने समन्स जारी केले आहे. नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच झाल्यापासून अडीच महिने उलटल्यानंतरही त्यासंबंधीच्या तांत्रिक समस्या सुटत नसल्यामुळे त्यांना पाचारण करण्यात आले आहे. सोमवार, 23 ऑगस्ट म्हणजे आजच त्यांना अर्थ मंत्रालयात हजर रहावे लागणार आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी 7 जून 2021 पासून नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू करण्यात आले आहे. 4,241 कोटी रुपये खर्चून इन्फोसिस कंपनीकडून हे पोर्टल विकसित करून घेण्यात आले आहे. सध्या 21 ऑगस्ट 2021 पासून हे नवीन पोर्टल बंद असल्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलमध्ये वारंवार अनेक समस्या येत आहेत. तसेच आयटी रिटर्न्स भरणाऱयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत नुकतीच न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच जून महिन्यात अनेक तक्रारी आल्यानंतर थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात संबंधितांकडे विचारणा केली होती. मात्र, तरीही समस्या कायम असल्याने आता थेट सीईओंना समन्स बजावण्यात आले आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी आणि गतिमान व्हावी या उद्देशाने 7 जून रोजी ई-फायलिंग वेबसाईट सुरु केली. मात्र, ही वेबसाईट करदात्यांसाठी त्रासदायकच ठरल्याची अनुभूती येत आहे. आता ऑगस्ट महिना संपत आला तरी करदात्यांना विवरणपत्र भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला लॉगिन होत नव्हते, आता लॉगिन होत आहे, मात्र फॉर्म भरण्याची प्रक्रिया किचकट आणि क्लिष्ट झाल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत.