टेम्पोतून वाहतूक : सावंतवाडीचा एकजण ताब्यात, साथीदार पसार
प्रतिनिधी / बांदा:
पेडणे येथून सावंतवाडीच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक करणाऱया टाटा एस टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील पथकाने कारवाई केली. या कारवाईत 8 लाख 71 हजार चारशे चाळीस रुपयांच्या दारूसह 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा टेम्पो असा 13 लाख 21 हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर विनापरवाना गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी समीर शंकर ठुंबरे (रा. वैश्यवाडा, कोलगाव दरवाजाजवळ, सावंतवाडी) याला अटक केली. तर त्याचा साथीदार पसार झाला. ही कारवाई शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इन्सुली कोठावळेबांध येथे झाली.
होळीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या दारुची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होण्याच्या शक्यतेने राज्य उत्पादन शुल्कतर्फे ठिकठिकाणी तपासणी सुरू होती. इन्सुली येथील पथकाला गोव्यातून सावंतवाडीच्या दिशेने वाहतूक होणार असल्याची पक्की खबर होती. त्यानुसार इन्सुली कोठावळे बांध येथे वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारा टेम्पो (एमएच-07/एजे-0451) तपासणीसाठी थांबविला असता चालकासोबत असलेला एकजण अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये ताडपत्रीच्या सहाय्याने लपविलेले गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे 135 बॉक्स आढळले. वाहन चालकाकडे चौकशी केली असता दारू सावंतवाडी येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली. याप्रकरणी चालकावर अटकेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण, दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, जवान रमेश चंदुरे, चालक संदीप कदम यांनी केली.
अवैध वाहतूकदारांचे धाबे दणाणले
अलिकडेच जिह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांनी इन्सुली येथील तपासणी नाक्यावर सर्व अधिकारी व पथक प्रमुखांची बैठक घेत होळीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर निर्बंध ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसात इन्सुली तपासणी नाक्याच्या भरारी पथकाने कारवाई केल्याने अवैध दारू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.