कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केली तयारी
प्रतिनिधी / बेळगाव
ब्रेड-बिस्किटे, मॅगी, इन्स्टंट फूड, जॅम, बटर…. हा कुठल्या हॉटेलमधला मेन्यू नाही तर कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांसाठी नागरिकांनी पूर्व तयारी म्हणून खरेदी केलेले हे साहित्य आहे. सध्या लॉकडाऊन सुरू आहेच परंतु सकाळी 6 ते 10 या वेळेत खरेदीला मुभा होती. मात्र आता शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असल्याने ही मुभा सुद्धा देण्यात येणार नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजारपेठेत नेहमीप्रमाणे गर्दी झाली. परंतु अधिकतर खरेदी इन्स्टंट फूडची झाली.
लॉकडाऊन हा शब्दच मुळात अनिश्चितता निर्माण करणारा आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये काही मिळणारच नाही असा विचार करून खरेदीसाठी गर्दी केली जाते. वास्तविक पहाता जीवनावश्यक साहित्य लॉकडाऊन काळात उपलब्ध होईल असे सरकारने स्पष्ट केले आहे. तरी सुद्धा लोकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याने कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला.
दोन दिवसांपूर्वी सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आणि पुन्हा नागरिकांची पावले बाजारपेठेकडे वळली. दोन दिवस लोकांनी भाजी व अन्य साहित्य खरेदी केले. मात्र शुक्रवारी प्रामुख्याने इन्स्टंट फुडवर भर दिल्याचे दिसून आले. शाळा नसल्याने मुले घरी आहेत. त्यामुळे मुलांची सतत विविध खाद्य पदार्थांची मागणी वाढत आहे.
पावसाळी वातावरण असले की, शहरात ठिकठिकाणी गरमागरम भजी, मक्मयाची कणसे, भाजलेल्या शेंगा मिळत असत. परंतु सध्या पावसाळी वातावरण असूनही कोरोनाने या सर्व छोटय़ा आनंदावर विरजण घातले आहे. त्यामुळे सध्या हे खाद्यपदार्थ तयार करण्याची जबाबदारी घरातील गृहीणीलाच घ्यावी लागत आहे. त्या दृष्टीने शुक्रवारी खरेदी झाली. इन्स्टंट इडली व दोसा पीठ, मॅगी, पराठय़ाचे बेसन, वेगवेगळय़ा कंपन्यांचे बटर आणि चिज, पनीर शिवाय पाणीपुरीच्या पुऱया, पावभाजीसाठी विविध भाज्या, इन्स्टंट मसाले, लोणची, ओट्स, जाम, अंडी, यांची खरेदी प्रामुख्याने झाली.
अपवाद वगळता सर्व सेवा व कार्यालये प्रामुख्याने बंद राहणार आहेत. घरी सर्वजण एकत्रच असल्याने खाद्यपदार्थांची मागणी वाढणार याचा अंदाज महिलांनाही आहे. त्यामुळे नेहमीच्याच चपाती, भाकरी व उप्पीट-पोहे या ऐवजी काही चमचमीत पदार्थ करण्याचे बेत असून त्या अनुषंगाने गर्दी झाली.