- इन्स्टाग्राम स्टिकरमध्ये शिवशंकरांच्या हातात वाईनचा ग्लास
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात सोशल मीडियावरून सुरू असलेल्या वादामध्ये आणखी एक भर पडली आहे. राजधानी दिल्लीतील एका भाजप नेत्याने इन्स्टाग्रामविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. इन्स्टाग्रामवर भगवान शिव शंकराचा अपमान केला असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या शिव शंकर देवाच्या भक्तीचे अनेक व्हिडीओ, फोटो इन्स्टाग्रामवर शेअर होत असतात. त्यातच नुकतेच इन्स्टाग्रामवर शिवशंकराचे काही स्टिकर्स देखील अपडेट करण्यात आले आहेत. मात्र यावरुन इन्स्टाग्रामविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भाजप नेते मनीष सिंह यांनी दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रिट पोलीस ठाण्यात इन्स्टाग्रामचे सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. इन्स्टाग्राम स्टिकर्समध्ये शिव हा शब्द टाकल्यानंतर शंकर देवाचे काही स्टिकर्स दिसतात. यामध्येच एक स्टिकर आहे, ज्यात शंकर देवाच्या एका हातात वाईनचा ग्लास तर दुसऱ्या हातात मोबाईल असलेला दिसून आले आहे.
या स्टिकर्सचे फोटो देखील मनीष सिंह यांनी शेअर केले आहेत. आणि या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, इन्स्टाग्राम सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वादाचा विषय ठरत आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम बॅन होण्याच्या मार्गावर होते.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी गुगलवर सर्वात खराब भाषा म्हणून सर्च केल्यास कन्नड भाषा दाखवण्यात येत होते. यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर गुगलने जाहीर माफी मागत गैरसमज आणि भावना दुखावल्यामुळे कंपनीने दिलगीरी व्यक्त केली होती.