पोलीस अधीक्षक बोस्युएट सिल्वा यांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
उद्यापासून सुरू होणाऱया 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) साक्षिदार होण्यासाठी देशभरातील अनेक अभिनेते, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गोव्यात दाखल होणार असून इफ्फीचा उद्घाटन आणि समारोप सोहळा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे.
महोत्सवातील उर्वरित कार्यक्रम पणजीतील आयनॉक्स आणि मॅकनिझ पॅलेस येथे होणार आहेत.
उद्यापासून पणजीत सुरू होणाऱया 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काळात राजधानीतील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक अधीक्षक बोस्युएट सिल्वा यांनी दिली.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाहतूक उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांचीही उपस्थिती होती.
बांबोळीमार्गे स्टेडियमकडे यावे
दि. 20 आणि 28 नोव्हेंबर रोजी मुखर्जी स्टेडियमवर होणाऱया उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास उपस्थित राहणाऱया (पणजी वगळता) उत्तर आणि दक्षिण गोव्यातून येणाऱयांनी बांबोळीत गोमेकॉजवळ पोहोचल्यानंतर गोवा विद्यापीठाच्या रस्त्याने येण्याची विनंती करण्यात आली आहे. पणजीकरांनी ताळगाव, दोनापावलामार्गे यावे पणजीहून येणाऱयांनी ताळगाव किंवा दोनापावलामार्गे कार्यक्रम स्थळी यावे, असे आवाहन केले आहे.
आयनॉक्स लेन नऊ दिवस बंद
वर्षपद्धतीप्रमाणे महोत्सव काळात दयानंद बांदोडकर मार्गावरून मनपा मार्केटजवळ येणारा (आयनॉक्स लेन) रस्ता संपूर्ण 9 दिवस वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) द्वारे जारी करण्यात आलेले पासधारक संबंधित पार्किंग जागेत वाहने पार्क करू शकतील.
सर्वांसाठी व्यवस्थित पार्किंग जागा
उद्घाटन आणि समारोप सोहळ्यासाठी निर्धारित करण्यात आलेली पार्किंगची ठिकाणे पुढीलप्रमाणे असून त्यात झोन ए 1 नुसार स्टेडियमच्या आत आणि झोन ए 2 नुसार स्टेडियमला लागून असलेल्या ओव्हरहेड पाण्याच्या टाकीजवळ मोकळय़ा जागेत पार्किंग करता येणार आहे. त्याशिवाय दोन्ही सोहळ्यांना उपस्थित राहणाऱया लोकांसाठी गोवा विद्यापीठ क्रिकेट मैदानाजवळील मोकळय़ा जागेत आणि ऑल इंडिया रेडिओ कंपाउंडजवळील मोकळय़ा जागेत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
महोत्सवाच्या दिवसात केवळ पास असलेल्या वाहनांनाच आयनॉक्स चित्रपटगृहाजवळील सर्व्हिस लेनमध्ये पार्क करण्याची परवानगी असेल. अन्य वाहने बांदोडकर फुटबॉल मैदानावर पार्क करता येतील. दयानंद बांदोडकर मार्गावर कोणत्याही वाहनास पार्किंगसाठी परवानगी दिली जाणार नाही. महोत्सव काळात सर्व वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी व शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.