कला, चित्रपट, संस्कृतीची झलक एकाच छताखाली : उद्घाटन सोहळय़ात अजय देवगणसह दिग्गजांची उपस्थिती
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत असून कला, चित्रपट, संस्कृतीची झलक एकाच छताखाली प्रदर्शित करण्यात येणार आहे. महोत्सवात यंदा 79 देशातील 280 चित्रपट प्रदर्शित पेले जाणार असून महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर यंदा फ्रान्स ‘कंट्री फोकस’ असून यात फ्रान्सचे आठ चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांनी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एनएफडीसीचे एमडी व महोत्सव संचालक रवींद्र भाकर, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्वा चंद्रा उपस्थित होते.
उद्घाटन सोहळय़ात दिग्गजांची उपस्थिती
आंचिमचा उद्घाटन सोहळा दि. 20 रोजी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियवर होणार असून यात अजय देवगण, सुनील शेट्टी, वरूण धवन, क्रीती सेनन, प्रभूदेवा, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, शेखर कपूर, राणा डगुबत्ती, मणिरत्नम, ए. आर रेहमान, पंकज त्रिपाठी, परेश रावल यांच्याबरोबर 118 आंतरराष्ट्रीय तर 221 भारतीय चित्रपट कलाकारांची उपस्थिती असणार आहे. उद्घाटन आणि समारोप सोहळय़ाला एकूण 14 सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असेल. ज्यात गोवा, फ्रान्स आणि स्पेन येथील डान्सग्रुप असतील. मागील ‘शंभर वर्षातील भारतीय चित्रपटांची उत्क्रांती’ ही उद्घाटन सोहळय़ाची थीम असेल.
‘अल्मा अँड ऑस्कर’ ने पडदा उघडणार
आंचिमचा पडदा डायटर बर्नर दिग्दर्शित ऑस्ट्रियन चित्रपट ‘अल्मा अँड ऑस्कर’ या चित्रपटाने उघडणार आहे तर क्रिस्झटॉफ झानुसीच्या ‘परफेक्ट नंबर’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल. तसेच ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात 25 फिचर फिल्म्स व 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवल्या जाणार आहेत.
‘हदिनेलेन्तु’ ने होणार इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन
इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन पृथ्वी कोनानूर्स यांच्या ‘हदिनेलेन्तु’ या कन्नड चित्रपटाने आणि दिव्या कोवास्जी यांच्या ‘शो मस्ट गो ऑन’ या चित्रपटाने होणार आहे. ‘चेलो शो – द लास्ट फिल्म शो’ या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचेही प्रदर्शन होणार आहे. याशिवाय 183 चित्रपट हे आंतरराष्ट्रीय प्रोग्रामिंगचा भाग असतील.
‘फाळके’ विजेत्या तीन चित्रपटांचा समावेश
यंदा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते तिसरी मंजिल, दो बदन, कटी पतंग हे तीन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. होमेज विभागात 15 भारतीय तर 5 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश असून भारतरत्न लता मंगेशकर, गीतकार बप्पी लाहिरी, कथ्थक मेस्ट्रो पं. बिरजू महाराज, कलाकार रमेश देव, रवी टंडन, केके, एकूण 17 कलाकारांना चित्रपटांद्वारे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
मणिपुरी चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सव
ईशान्य भारतातील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी मणिपुरी चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यात 5 फीचर आणि 5 नॉन फिचर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. एनएफआयतर्फे ‘इंडियन रिस्टोर्ड क्लासिक या विभागातून काही चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत शिमगा, कार्निव्हल
आझादी का अमृतमहोत्सवअंतर्गत दि. 26 रोजी शिमगोत्सव आणि दि. 27 रोजी कार्निव्हलवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सदर प्रदर्शन महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरेल. पणजीत विविध ठिकाणी ओपन एअर स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. हिंदी चित्रपटांचे प्रीमीयरही होणार असून यावेळी त्या चित्रपटांच्या कलाकारांची उपस्थिती असेल. यात परेश रावल यांचा ‘द स्टोरी टेलर’, अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’, वरूण धवनचा ‘भेडिया’ आणि यामी गौतमचा ‘लॉस्ट’ यांचा समावेश आहे.
चित्रपटांबरोबर प्रख्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांसोबत 23 मास्टरक्लास आणि इन कॉन्व्हर्सेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचा पटकथा लेखनावर, ए. श्रीकर प्रसाद यांचा संपादनावर आणि अनुपम खेर यांचा अभिनयावर मास्टरक्लास असेल. याचबरोबर आशा पारेख, प्रसून जोशी, आर. बाल्की, नवाजुद्दीन सिद्दीकी यांचीही सत्रे असणार आहेत. नोंदणी न केलेल्या प्रतिनिधींनासुद्धा या मास्टरक्लासमध्ये सहभाग नोंदविण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती मुरूगन यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या विविध ठिकाणांना भेटी देऊन एकंदरित तयारीचा आढावा घेतला. यंदाचा ‘फिल्म बाजार’ यूथ हॉस्टेलजवळील मांडवी किनाऱयावर भरणार असून तो यादगार ठरणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाच्या महोत्सवात पुन्हा एकदा उत्साह दिसत असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक व इतर मंडळी गोव्यातील महोत्सवाला येण्यासाठी उत्साहित असून त्यांच्याकडून सातत्याने विचारणा होत आहे. महोत्सवाची सर्व तयारी पूर्णत्त्वाकडे जात असून येत्या काही दिवसांत ती परिपूर्ण होऊन एकंदरित यंदाचा महोत्सव यशस्वी होईल आणि तो सर्वांच्या स्मरणात राहील, असे मत डॉ. सावंत यांनी व्यक्त केले.
महनीय व्यक्तींचे 18 पासून आगमन
एनएफडीसी, ईएसजी, गोवा सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 28 नोव्हेंबर 2022 असा हा 53 वा महोत्सव आखण्यात आला असून 18 नोव्हेंबरपासून महोत्सवातील महनीय व्यक्तींचे गोव्यात येणे सुरू होणार आहे. फिल्म बाजार सर्वांसाठी खुला असून तो खास आकर्षण ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
इफ्फीसाठी नऊ थिएटर्स उपलब्ध महोत्सवासाठी एकूण 9 थिएटर्स असून अनेक सार्वजनिक ठिकाणी चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. गोव्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी स्पेशल मास्टर क्लास ठेवण्यात आला आहे. आझादी का अमृतमहोत्सवाच्या काळातच हा चित्रपट महोत्सव होत असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे. हा सर्वांत चांगला महोत्सव होणार, असा विश्वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला असून सर्वप्रकारच्या साधनसुविधांची तयारी करण्यात आली आहे. फिल्म बाजारमध्ये विविध राज्यांचे, देशांचे स्टॉल-दालने त्यात समाविष्ट करण्यात आली असून जास्तीत जास्त लोकांनी बाजाराला भेट द्यावी म्हणून तो सर्वांसाठी खुला ठेवण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.