स्टॉकहोम : स्वीडन फुटबॉल संघटनेने झेड. इब्राहिमोविकची गोल्डन बॉल पुरस्कारासाठी निवड केली. याशिवाय चेल्सीच्या मॅग्डालेना एरिकसनने पहिल्यांदाच महिलांचा डायमंड बॉल पुरस्कार मिळविला. स्वीडनतर्फे प्रतिवर्षी सर्वोत्तम खेळाडूला पुरस्कार देण्यात येतो. सोमवारी ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार सोहळा पार पडला.
इब्राहिमोविकला विक्रमी 12 व्यांदा हा पुरस्कार मिळाला असून स्वीडनतर्फे त्याने विक्रमी गोल नोंदवले आहेत. 116 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने एकूण 62 गोल नोंदवले असून यावेळी तो एसी मिलान क्लबकडून खेळत आहे. 39 वर्षीय इब्राहिमोविक जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे पाहून ज्युरीनी त्याची गोल्डन बॉल पुरस्कारासाठी निवड केली. 2016 मध्ये तो राष्ट्रीय संघातून निवृत्त झाला होता आणि त्याच वर्षी त्याला शेवटचा गोल्डन बॉल पुरस्कार मिळाला होता. त्याच्याशिवाय अन्य एकाही खेळाडूला दोनपेक्षा अधिक वेळा हा पुरस्कार मिळविता आलेला नाही. महिलांमध्ये 27 वर्षीय एरिकसनने चेल्सीचे नेतृत्व करताना इंग्लिश मोसमात आपल्या संघाला महिलांच्या सुपरलीगचे जेतेपद मिळवून दिले. तिने आतापर्यंत 60 आंतरराष्ट्रीय सामन्यांत स्वीडनचे प्रतिनिधित्व केले आहे.