उत्पादन क्षमता मजबूत करणार – 2025 पर्यंतचे लक्ष
वृत्तसंस्था/ मुंबई
इमामी ऍग्रोटेकने वर्ष 2025 पर्यंत 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. एफएमसीजी क्षेत्रातील इमामी लिमिटेडची ही सहकारी कंपनी आहे. ही मूळस्वरुपात खाण्याचे तेल आणि बायोडिझेलसह विविध प्रकारच्या व्यवसायात कार्यरत आहे.
कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार इमामीने गुजरात कांडलामध्ये आपला नवीन प्रकल्प सुरु केला आहे. सदरच्या प्रकल्पात खाण्याच्या तेलाचे उत्पादन घेतले जाते. नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यकाळात आपली प्रगती साधण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. खाण्याच्या तेलासोबत फूड सेगमेंट आणि इतर व्यवसायांच्या वाढीवर कंपनी लक्ष केंद्रीत करणार असून कांडला रियायनरीची उत्पादन क्षमता जवळपास 3200 टन प्रतीदिन केली आहे. उत्पादनात सदरची कंपनी ही भारतामधील चौथ्या नंबरची आहे.
कंपनीचा एक उत्पादन प्रकल्प हा हल्दियामध्ये आहे, तर दुसरा कृष्णापट्टनम आणि तिसरा जयपूर या ठिकाणी असल्याची माहिती आहे. कांडला प्रकल्पासोबत इमामी ऍग्रोटेकची उत्पादन क्षमता 12 हजार टन करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
युरोपीयन मशीनचा वापर
सदरच्या प्रकल्पांमध्ये युरोपीयन मशीनरीचा वापर करण्यात येणार आहे. भारतीय गोडय़ा तेलाच्या इंडस्ट्रीजमध्ये नवीन मशीनरींचा वापर केला जाणार आहे. कांडला क्षेत्रात हा खाण्यासंदर्भातल्या उत्पादनांची निर्मिती करणारा एकमेव प्रकल्प असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.