प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील 493 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा अशा नोटीसा मुख्याधिकाऱयांनी संबंधितांना धाडल्या आहेत. त्याची मुदत आता संपत आली असतानाच एकाही सोसायटी, मालकाने याचा अहवाल दिलेला नाही. यावरून स्ट्रक्चरल ऑडीट करण्यास उदासीनता असल्याचे दिसून येत असून सुरक्षिततेच्या कामातही राजकारण शिरल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे अहवाल न दिल्यास तसा अहवाल नगर परिषद जिल्हाधिकाऱयांना देणार असून त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कारवाई केली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी महाड येथे इमारत कोसळून अनेकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी चिपळुणातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना केल्या असून त्यानुसार त्यांनी 493 इमारतींच्या संबधितांना नोटीसा देऊन 15 दिवसांत हे ऑडीट करून त्याचा अहवाल नगर परिषदेला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. एवढेच नव्हेतर असे ऑडीट करणाऱया 10 व्यक्तींची नावेही देण्यात आली आहे. मात्र त्याव्यतिरिक्त कोणाकडूनही ऑडीट केल्यास त्यावर हरकत राहणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या नोटीसा देऊन 13 दिवस झाले आहेत. तरीही अद्याप कोणीही आपला अहवाल सादर केलेला नाही. असे असतानाच काही राजकारण्यांनी या सुरक्षिततेच्या कामात राजकारण आणताना यासाठी येणारा खर्च परवडणारा नाही असे कारण पुढे आणत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका होत आहे. मुळातच स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी 1 लाख रूपये खर्च येतो असे सागितले जात आहे, तर दुसरीकडे पूर्वीच्याच व्यक्तीकडून ते केल्यास हा खर्चही कमी होऊ शकतो. आता ऑडीट करण्यासाठी येणाऱया खर्चाचा विचार केला गेला तर भविष्यात दुर्दैवाने इमारत पडण्याची प्रकार घडल्यास तेव्हा किती हानी होईल ती हानी संबंधितांसह राजकारणी कशी भरून काढणार, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत.
ऑडीट करण्याची मुदत वाढवून मिळू शकते. मात्र अहवाल न देण्याबरोबरच मुदतही वाढवून न मागितल्यास तसा अहवाल जिल्हाधिकारी मिश्रा यांना पाठवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यानंतर हा अहवाल बघून जिल्हाधिकारी मिश्रा हे सूचना देतील त्यापध्दतीने संबंधितांवर कारवाई केली जाईल असे संकेत प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे जुन्या इमारतींचे संबंधित सोसायटय़ा, मालक स्ट्रक्चरल ऑडीट करून घेणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.