कॅन्टोन्मेंट बोर्डचा प्रस्ताव : उद्या होणाऱया बैठकीनंतर घेतला जाणार निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डला शासनाकडून मिळणारे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे महसूल वसुलीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत इमारत बांधकाम परवाना शुल्क वसुलीच्या पद्धतीत बदल करण्यात आला असून यापुढे इमारतीच्या आकारमानानुसार परवाना शुल्क वसूल केले जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 10 रोजी सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या अजेंडय़ावर विविध विषयांसह इमारत बांधकाम परवाना शुल्क आकारणीचा विषय घेण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र कॅन्टोन्मेंटकडून परवानगी देण्यासाठी ठराविक रक्कम शुल्क म्हणून आकारली जाते. यापूर्वी इमारत बांधकाम परवानगीसाठी 500 चौरस फूट आणि 1 हजार चौरस फूट व त्याहून अधिक अशा स्लॅबनुसार परवाना शुल्क आकारला जातो मात्र लहान आकाराच्या इमारत बांधकाम धारकांना ही शुल्क आकारणी नुकसानकारक आहे. तर मोठय़ा आकाराच्या इमारत धारकांसाठी शुल्क आकारणीची पद्धत फायदेशीर आहे. त्यामुळे सदर्न कमांड विभागाने शुल्क आकारणीमध्ये बदल करण्याची सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे.
त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने इमारत बांधकाम शुल्क आकारणीमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यापुढे इमारतीच्या बांधकामानुसार शुल्क आकारणी केली जाणार आहे. तसेच विकास कर आणि विविध कर आकारले जाणार आहेत. रहिवासी, व्यावसायिक आणि रहिवासी-व्यावसायिक व्यापारी संकुलासाठी विकासकर निश्चित करण्यात आला आहे. तसेच इमारतीच्या बांधकाम खर्चावर 1 टक्का कामगार कल्याण निधी आकारला जाणार आहे. तसेच डेब्रिज उचलीसाठी प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये शुल्क आकारणी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे हा प्रस्ताव लहान बांधकामधारकांसाठी फायदेशीर राहणार आहे. या प्रस्तावावर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.