मनपाचे नगर योजना अधिकारी बसवराज हिरेमठ यांची माहिती : नागरिकांच्या तक्रारींची घेतली दखल
प्रतिनिधी / बेळगाव
मनपाकडून इमारत बांधकाम परवाने देण्यात येणाऱया ‘निर्माण-2 मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने परवाने देण्याचे ठप्प झाले होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. मात्र ‘निर्माण-2’मधील तांत्रिक अडचणींचे निवारण करण्यात आले असून इमारत बांधकाम परवानगी अर्ज वितरणाचे काम सोमवारपासून सुरळीत सुरू आहे.
इमारत बांधकाम परवाने देण्यासाठी नगर विकास खात्याने ‘निर्माण-1’ची संगणकीय प्रणाली लागू केली होती. मात्र, ऑनलाईन प्रणालीमधील त्रुटांमुळे बांधकाम परवाने मिळणे कठीण बनले होते. बांधकाम परवानगीकरिता नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत होत्या. त्यामुळे त्रुटीचे निवारण करून ‘निर्माण-2’ ही ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली. पण यामध्ये वारंवार बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्व्हर डाऊन होण्याची तक्रार वाढली होती. त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेली ‘निर्माण-2’ प्रणालीही नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांना डोकेदुखीची बनली होती. या प्रणालीमधील त्रुटी दूर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया बंद ठेवली होती. त्यामुळे काही दिवसांकरिता ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण या प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत. इमारत बांधकाम परवानगीकरिता नागरिकांना कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत.
बेंगळूर येथील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण राज्यातील बांधकाम परवानगी वितरणाचे काम ठप्प झाले होते. दुरुस्तीचे काम कंत्राटी पद्धतीने सॉफ्टवेअर कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. पण कंपनीच्या तंत्रज्ञांना कोरोनाची लागण झाल्याने सर्व्हरच्या दुरुस्तीकरिता विलंब झाला असल्याची माहिती देण्यात आली. पण सदर प्रणालीतील त्रुटीचे निवारण करून सोमवारपासून इमारत बांधकाम परवान्याचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे नगर योजना अधिकारी बसवराज हिरेमठ यांनी दिली.