इस्लामाबाद / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील तालिबान ही लष्करी शक्ती नसून ते त्या देशाचे सर्वसामान्य नागरिक असल्याने पाकिस्तान त्यांना मारु शकत नाही, अशी साळसूद भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली आहे. एक प्रकारे तालिबानच्या आक्रमक आणि कट्टर धर्मवादी विचारसरणीचे समर्थनच त्यांनी केले. मात्र, अफगाणिस्तानच्या सरकारने या भूमिकेचा तीव्र निषेध केला.
सध्या अफगाणिस्तानात तालिबान आणि सरकारी सेना यांच्यात तुंबळ रणकंदन सुरू आहे. त्यामुळे हिंसाचाराचे थैमान माजले आहे. अमेरिकेने तेथून आपले सैन्य पूर्णतः मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने त्या देशात दहशतवादी लोकांच्या हाती सत्ता जाण्याची भीती जगभरात व्यक्त होत आहे. अफगाणिस्तानमध्ये इस्लामी दहशतवाद्यांचे प्राबल्य निर्माण झाल्यास साऱया जगात पुन्हा हा दहशतवाद डोके वर काढले आणि शांतता भंग होईल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
पाक विमानांचे संरक्षण
अफगाणिस्तानात हिंसाचार माजविणाऱया तालिबानला पाकिस्तानच्या वायुदलाने संरक्षक कवच पुरविले आहे. तालिबानवर हल्ला कराल तर पाकिस्तानचे वायुदल अफगाणिस्तानच्या सेनेवर हल्ला चढवेल अशी धमकी इम्रान खान यांनी दिल्याचा आरोप अफगाणिस्तानचे उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी केला आहे. आपल्या आरोपाचे पुरावे आमच्याकडे असून आरोप खोटे आहेत असे कोणी म्हटल्यास ते सादर केले जातील, असेही प्रतिपादन त्यांनी केले. मात्र असे असूनही अफगाणिस्तान घशात घालणे कोणालाही जमणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.