वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी तसेच मनी लाँड्रींग आरोपाखाली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान याला अटक होण्याची शक्मयता आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने ही शक्यता वर्तविली असून येत्या दोन-तीन दिवसात ही कारवाई होऊ शकते. शुक्रवारी प्राधिकरणाने इम्रान खानला यासंदर्भात नोटीस पाठविली आहे. आतापर्यंतच्या दोन नोटिसांना इम्रान खानने प्रतिसाद न दिल्याने त्याच्याविरोधात ही अटकेची कारवाई केली जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.
एक-दोन दिवसात इम्रान खानला तिसरी नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतरही तो अनुपस्थित राहिल्यास त्याला अटक करून ताब्यात घेतले जाईल. अन्वेषण प्राधिकरणाने इम्रान खानच्या अनेक कंपन्यांवर धाडी टाकल्या असून या भ्रष्टाचाराची पाळेमुळे विदेशांमध्येही पसरली असल्याचे दिसून आले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि बेल्जियममध्ये या कंपन्यांचे बेहिशेबी व्यवहार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक कागदपत्रे प्राधिकरणाने जप्त केली असून या सर्व भ्रष्टाचारात इम्रान खानचाही हात असल्याचे या कागदपत्रांवरून दिसून आल्याचे सांगितले जाते.