बाजवा यांना मुदतवाढ देण्याचा विचार नाही
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा सैन्याला भिडण्याचा प्रयत्न करत आहेत. सैन्यप्रमुख जनरल बाजवा यांना मुदतवाढ देण्याचा विचार केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाजवा यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. यापूर्वी इम्रान आणि सैन्यप्रमुख यांच्यात माजी आयएसआय प्रमुख जनरल फैज हमीद यांच्या बदलीवरून वाद झाला होता. इम्रान हे जनरल फैज यांच्या बदलीच्या विरोधात होते. याप्रकरणी इम्रान यांना माघार घ्यावी लागली होती.
पाकिस्तानात सर्वसाधारणपणे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती सैन्य तसेच आयएसआय प्रमुखांच्या नियुक्तीशी संबंधित मुद्दय़ावर जाहीर टिप्पणी करत नाहीत. परंतु इम्रान यांनी याप्रकरणी देखील वेगळी भूमिका घेतली आहे. नवे वर्ष आता सुरू झाले असून नोव्हेंबर अद्याप दूर असल्याचे म्हणत इम्रान यांनी सैन्यप्रमुखांशी पंगा घेतला आहे.
सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे वय 61 वर्षे असून ते 28 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. सैन्यप्रमुख म्हणून 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर बाजवा हे 29 नोव्हेंबर 2019 मध्ये निवृत्त होणार होते. परंतु इम्रान यांना बाजवा यांनीच सत्तास्थानी पोहोचविले असल्याने त्यांना 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ घटनाविरोधी असल्याने सर्वोच्च न्यायालय मुदतवाढीचा कालावधी 3 वर्षांऐवजी 6 महिन्यांचा केला होता. त्यानंतर इम्रान सरकारने संसदेत एक कायदा संमत करून सैन्यप्रमुखांच्या निवृत्तीचे वय 64 वर्षे केले होते. अशा स्थितीत बाजवा आणखीन एक मुदतवाढ घेत पदावर अजून 3 वर्षे राहू शकतात. परंतु त्यांच्या मुदतवाढीला पंतप्रधान इम्रान खान यांची मंजुरी आवश्यक आहे.