इस्लामाबाद
पाकिस्तानच्या संसदेचे कामकाज पहिल्याच दिवशी तहकूब करण्यात आले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) खासदार मलिक अहमद हुसैन देहर यांनी शुक्रवारी इम्रान खानविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर यु टर्न घेतल्याने इम्रान खान यांचे पारडे जड झाले आहे. ‘मी सरकारसोबत आहे. पंतप्रधानांसोबत माझे जे काही मतभेद आहेत, त्यावर तोडगा निघताच मी त्यांना पाठिंबा देईन, असे शुक्रवारी मलिक यांनी स्पष्ट केले. आता नॅशनल असेंब्लीची बैठक सोमवार, 28 मार्च रोजी दुपारी 4 वाजता सुरू होणार असून त्यामध्ये इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. शुक्रवारी संसदेचे कामकाज सुरू होते. तथापि, खासदार ख्याल जमान यांच्या निधनानंतर सभागृहाची ही पहिलीच बैठक होती. पाकिस्तानच्या संसदीय परंपरेनुसार, खासदाराच्या मृत्यूनंतर सदनाच्या पहिल्या बैठकीतच श्रद्धांजली वाहिली जाते. या श्रद्धांजलीपर बैठकीनंतर सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता अविश्वास प्रस्तावावर पुढील आठवडय़ातच संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.