वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मागील वर्षी इराणचा जनरल आणि एक प्रभावशाली इराकी मिलिशिया नेता मारल्याप्रकरणी इराकच्या न्यायालयाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे. इराणनेही याप्रकरणी ट्रम्प यांच्याविरोधात वॉरंट बजावले आहेत. तर इराणने इंटरपोलकडून अटकेसाठी मदतही मागितली आहे.
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी आणि अबू माहदी अल मुहंदिस मारला गेल्यावर बगदादच्या तपास न्यायालयाच्या न्यायाधीशांनी वॉरंट बजावले आहे. सुलेमानी आणि मुहंदिस मागील वर्षी जानेवारीत बगदाद विमानतळाबाहेर ड्रोन हल्ल्यात मारले गेले होते. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराक यांच्यात राजनयिक संकट निर्माण झाले होते.
इराणने जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या एका वर्षाने पुन्हा इंटरपोलकडून ट्रम्प यांच्या अटकेसाठी मदत मागितली आहे. ट्रम्प यांच्यासमवेत अमेरिकेच्या 47 अधिकाऱयांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याचे आवाहन इराणकडून इंटरपोलला करण्यात आले आहे. इराणने यापूर्वी जून महिन्यात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची केलेली मागणी फेटाळण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार
रिव्होल्युशनरी गार्डचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येसाठी अमेरिकचे अध्यक्ष आणि पेंटागॉनच्या कमांडरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात यावी. आमच्या कमांडरच्या हत्येसाठी जबाबदार लोकांना शिक्षा मिळवून देण्यासाठी आम्ही गंभीर आहोत असे इराणचे न्यायिक प्रवक्ते गुलाम हुसैन इस्माइली यांनी म्हटले आहे. इराणने याप्रकरणी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असून याकरता 1000 पानी आरोपपत्रही तयार करण्यात आले आहे.
इराकशीही शत्रुत्व
इराकी न्यायालयाच्या निर्णयानंतर अमेरिका पश्चिम आशियातील या देशामधूनही स्वतःचा गाशा गुंडाळणार असल्याचा कयास वर्तविला जात आहे. बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर इराणकडून समर्थनप्राप्त गट सातत्याने अग्निबाण डागत आहेत. तर सैन्यतळाची सुरक्षा राखण्याकरता अमेरिकेला प्रचंड रक्कम खर्च करावी लागत आहे. मागील दीड महिन्यात अमेरिकेच्या दूतावासावर दोनवेळा अग्निबाण हल्ले झाले आहेत.