ऑनलाईन टीम / बगदाद :
इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ रविवारी सकाळी दोन रॉकेट डागण्यात आले. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. इराकी वृत्तसंस्थेने लष्कराचा हवाला देत म्हटले आहे की, सी-रॅम संरक्षण यंत्रणेने यातील एक रॉकेट हवेतच नष्ट केले. परंतु दुसरे रॉकेट ग्रीन झोनमध्ये पडले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, दोन गाडय़ांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, सुरक्षा दलांनी रॉकेट डागण्यात आलेल्या ठिकाणाचा शोध सुरू केला आहे. हा हल्ला इराण समर्थित असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही बगदादमध्ये जोरदार तटबंदी असलेल्या ग्रीनझोनमध्ये रॉकेट हल्ले करण्यात आले होते. अमेरिकेच्या दुतावासाला लक्ष्य करुन जानेवारी आणि जून 2020 आणि फेब्रुवारी2021 मध्ये इराणने अमेरिकेच्या इराकमधील दुतावासाजवळ रॉकेट हल्ले केले होते.