रॉकेट्स मारा : दोन दिवसांपूर्वी ड्रोन केला होता नष्ट
वृत्तसंस्था /बगदाद
इराकची राजधानी बगदादमध्ये गुरुवारी अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झाला आहे. अमेरिकेच्या दूतावासाला रॉकेट्सनी लक्ष्य करण्यात आले आहे. दूतावासावर एका मागोमाग एक असे तीन रॉकेट्स डागण्यात आले आहेत.
तर दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सैन्याने दूतावासानजीक उडणारा एक ड्रोन नष्ट केला होता. तत्पूर्वी इराकमधील वायुतळावर तैनात अमेरिकेच्या सैनिकांवर 14 रॉकेट्स डागण्यात आले होते. या हल्ल्यात 2 जण जखमी झाले होते. इराकसोबतच आता सीरियातही अमेरिकेच्या सैन्याला लक्ष्य करण्यात येत आहे. बगदादच्या ग्रीन झोन भागात दोन रॉकेट्स कोसळली आहेत. ग्रीन झोनमध्ये अनेक विदेशी दूतावास आणि शासकीय इमारती आहेत. दूतावासाच्या अँटी रॉकेट सिस्टीमने एका रॉकेटची दिशा बदलली होती. हे रॉकेट ग्रीन झोननजीक कोसळले आहे. या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कुणीच स्वीकारलेली नाही.