पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी सुदैवाने बचावले – 6 सुरक्षा अधिकारी जखमी
वृत्तसंस्था/ बगदाद
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांच्या निवासस्थानी रविवारी पहाटे ड्रोनने हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते सुदैवाने बचावले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला लक्ष्य करत स्फोटकांनी भरलेल्या एका ड्रोनद्वारे हल्ला झाला. हा पंतप्रधान कदीमी यांच्या हत्येचा प्रयत्न होता. या हल्ल्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात 6 अधिकारी जखमी झाल्याचे इराकच्या सैन्याकडून सांगण्यात आले.
ड्रोन हल्ल्यामुळे पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या एका हिस्स्याचे मोठे नुकसान झाले आहे. कुठल्याही गटाने आतापर्यंत बगदादच्या ग्रीन झोनमधील पंतप्रधान निवासस्थानावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. याच झोनमध्ये अनेक शासकीय इमारती आणि विदेशी दूतावास आहेत.
देशात मागील महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर इराकच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी हा हल्ला झाला आहे. शुक्रवारीच बगदादच्या ग्रीन झोनच्या बाहेर ठाण मांडून बसलेले इराणसमर्थक शिया सशस्त्र गटांचे समर्थक आणि दंगलविरोधी पोलिसांमध्ये हिंसक झटापट झाली होती.
एका निदर्शकाचा मृत्यू
या घटनेत एका निदर्शकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, ज्यात बहुतांश जण हे सुरक्षा दलांचे सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीतील पराभव निदर्शकांनी नाकारला आहे. या निवडणुकीत इराणसमर्थक पक्षांना मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले होते.