ऑनलाईन टीम / तेहरान :
बगदादमध्ये ड्रोन हल्ल्यात इराणी मेजर जनरल कासीम सुलेमानी यांची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 12 जणांवर इराणने अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच ट्रम्प यांना पकडण्यासाठी इराणने थेट इंटरपोलकडे मदत मागितली आहे.
इराकच्या बगदाद शहरात 3 जानेवारीला अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाले होते. सुलेमानी हे इराणचे टॉप लष्करी जनरल म्हणून ओळखले जात होते. सुलेमानी यांच्या हत्येप्रकरणी ट्रम्प यांच्यासह 30 जणांवर सुलेमानी यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे, असे तेहराण वकील अली अल्कासीमदेर यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या अटकेसाठी इराणने इंटरपोलकडे मदत मागितली असून, ट्रम्प यांची राष्ट्राअध्यक्ष पदाची मुदत संपल्यानंतरही त्यांच्याविरोधात खटला सुरुच ठेवणार असल्याचेही अल्कासीमदेर यांनी सांगितले.