शरीरावर चिकटविले 85 चमचे
इराणच्या एका व्यक्तीने स्वतःच्या शरीरावर एकाचवेळी 85 चमचे संतुलित करून एक अजब गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला आहे. इराणच्या एकेराज येथील 50 वर्षीय अबोलफजल साबर मोख्तारी यांनी ही कामगिरी करून दाखविली आहे. लहानपणापासूनच स्वतःच्या शरीरावर चमच्यांना संतुलित करत असल्याचे त्यांनी सांगितले. बालपणी एकेदिवशी अचानक स्वतःच्या या अनोख्या गुणवत्तेविषयी समजल्याचे त्यांनी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सशी बोलताना सांगितले आहे.
अनेक वर्षांची मेहनत आणि अभ्यासानतंर स्वतःच्या गुणवत्तेत भर घालू शकलो. स्वतःच्या शरीरावर संतुलित करू शकणार नाही असे आता काहीच राहिले नाही. प्लास्टिक, काच, फळ, दगड, लाकूड तसेच कुठल्याही माणसालाही स्वतःच्या शरीरावर चिकटवून ठेवू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
लक्ष अन् ऊर्जा हस्तांतरणाचा खेळ
मी कुठल्याही गोष्टीला स्पर्श करू शकतो किंवा त्याची जाणीव करू शकल्यावर माझी ऊर्जा त्यात हस्तांतरित करू शकतो. स्वतःच्या शरीराला स्पर्श करणाऱया कुठल्याही गोष्टीवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो आणि अशाप्रकारे हे घडून येते. जे काही स्वतःच्या शरीरावर चिकटविण्याचा प्रयत्न करतो, त्यावर लक्ष केंद्रीत करतो, ज्यामुळे ऊर्जेचे हस्तांतरण होऊन ती गोष्ट माझ्या शरीराला चिकटत असल्याचे ते म्हणाले.
मागील वर्षी अपयश स्वतःच्या या अद्भूत गुणवत्तेनंतरही मोख्तारी यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळविण्यासाठी कठोर मेहनत करावी लागली आहे. त्यांनी मागील उन्हाळय़ात देखील हा विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना हवामानाने साथ दिली नव्हती. विक्रमासाठी आवश्यक दिशानिर्देशांनुसार चमच्यांना एका निश्चित वेळेपर्यंत शरीरावर संतुलित ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळा आणि घामुळे 80 व्या गुणापर्यंत पोहोचताच माझ्या शरीरावरून काही चमचे खाली पडले होते असे मोखारी यांनी सांगितले. शरीरावर सर्वाधिक चमचे संतुलित करण्याचा मागील विक्रम स्पेनचे मार्कोस रुइज सेबलोस यांच्या नावावर होता. त्यांनी स्वतःच्या शरीरावर 64 चमच्यांना संतुलित केले होते.