ऑनलाईन टीम / तेहरान :
इराणमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून, 32 प्रांत रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी देशवासीयांना कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याची सूचना केली आहे.
इराणच्या नागरिकांमध्ये नव्याने संसर्गाची लक्षणे दिसू लागली आहेत. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच दिवसभरात सापडणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3500 च्या वर तर दिवसभरातील मृतांची संख्या 200 च्या पुढे गेली आहे. फेब्रुवारीत इराणमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये कोरोनाची दुसरी लाट नोंदवली गेली. त्यानंतर कोरोना रुग्णांचे कमी झालेले प्रमाण आता वाढायला लागले आहे.
इराणमध्ये आतापर्यंत 4 लाख 49 हजार 960 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामधील 3 लाख 76 हजार 531 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 47 हजार 650 रुग्ण उपचार घेत असून, 4068 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 25 हजार 779 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.