तेहरान / वृत्तसंस्था :
युक्रेन एअरलाईन्सचे विमान इराणच्या क्षेपणास्त्रांमुळेच कोसळल्याची कबुली दिल्यावर देशाचे सर्वोच्च नेते खामनेई यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत. आयतुल्लाह खामनेई यांच्या राजीनाम्याची मागणी या निदर्शकांनी केली आहे. स्थितीवर नजर ठेवून आता दुसरा ‘नरसंहार’ होऊ नये असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. विमान कोसळल्याने 176 जणांना जीव गमवावा लागला होता.
इराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकेच्या दूतावासाबाहेर हजारो लोक निदर्शनासाठी एकत्र आले. तर अमीर काबिर विद्यापीठाबाहेरही इराण सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. हातात फलक घेतलेल्या लोकांनी खामनेई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी एकत्र येत विमान कोसळल्याने मारले गेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इराणमध्ये आक्रोश
इराणने पाडविलेल्या विमानातून त्याचेच सर्वाधिक नागरिक प्रवास करत होते. या दुर्घटनेत इराणचे 82 तर कॅनडाचे 63 जण मृत्युमुखी पडले आहेत. 8 जानेवारी रोजी हे विमान युक्रेनची राजधानी कीव्ह येथे जात होते. यात इराण आणि कॅनडासह युक्रेनचे 11, स्वीडनचे 10 अफगाणिस्तानचे 4 तर जर्मनी आणि ब्रिटनचे प्रत्येकी 3 नागरिक सामील होते.
अक्षम्य चूक
मानवी चुकीमुळे क्षेपणास्त्र डागण्यात आल्याने विमान कोसळले आहे. हा प्रकार अक्षम्य असल्याचे विधान इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी केले आहे. तर इराणचे विदेशमंत्री जवाद जरीफ यांनी अमेरिकेच्या हल्ल्यावेळी मानवी चुकीमुळे दुर्घटना घडली असून याचा आम्हाला पश्चाताप होत असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटनचा राजदूत ताब्यात
इराणने ब्रिटनच्या राजदूताला ताब्यात घेतले होते. पण काही वेळातच त्यांची सुटका करण्यात आली आहे. इराणनेच विमान पाडविल्याचा संशय ब्रिटन आणि कॅनडानेच सर्वप्रथम व्यक्त केला होता. युक्रेनचे विमान इराणच्या क्षेपणास्त्रांमुळेच कोसळल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या अहवालातून समोर आल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी म्हटले होते.
इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव
इराण काही काळापर्यंत स्वतःच्या चुकीने विमान कोसळल्याचे नाकारत राहिला होता. पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर त्याला याची कबुली द्यावी लागली आहे. कमांडर कासिम सुलेमानीचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्यावर सूडाची कारवाई करत इराणने इराकमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रs डागली होती. या कारवाई दरम्यानच युक्रेनचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले हेते.